गंगापुरच्या नगराध्यक्ष, नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

Foto
प्रभाग क्रमांक ९ मधील मतदार केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान

गंगापूर, (प्रतिनिधी):  नगर परिषद निवडणूक २०२५ साठीची मतदान प्रक्रिया मंगळवारी दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० पासून संध्याकाळी उशिरापर्यंत शांततेत पार पडली.

शहरातील प्रभाग ४ ब व ६ ब ची निवडणूक स्थगित झाल्याने उर्वरित १० प्रभागांतील १८ जागांसाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. नगराध्य१९६० पदासाठी सहा, तर नगरसेवक पदासाठी ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
मतदाना दरम्यान शहरातील प्रभाग क्रमांक २, ३ आणि ९ येथे उमेदवार समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याच्या किरकोळ घटना घडल्या. तणाव निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे व पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व त्यांची टीम यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही प्रकरणात गुन्हा नोंद झालेला नाही.

एक महत्त्वाची घटना  : 
प्रभाग क्रमांक २ मधील बूथ क्रमांक ३ वर एका महिलेला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तिच्या नावावर अन्य व्यक्तीने मतदान केल्याची माहिती पुढे आली. तरीही त्या महिलेकडून कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवली नाही.

प्रत्येक प्रभागामध्ये दुपारनंतर मतदानास वाढला प्रतिसाद  :  
शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मतदानाची निर्धारित वेळ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असली तरी, अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या. त्यामुळे काही ठिकाणी रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. शहरातील एकूण मतदानाची आकडेवारी नगर परिषद मतदार संख्या २९ हजार २८७ पैकी तब्बल २१ हजार १७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १० हजार ७८८ पुरूष तर १० हजार २२८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाचा टक्काः ७१.७६% झाले.

प्रभाग क्रमांक ४ ब, ६ ब प्रभागातील मतदान २० डिसेंबर :
प्रभाग क्रमांक ४ ब व ६ ब येथील आक्षेपांमुळे या दोन प्रभागातील मतदान २० डिसेंबर रोजी घेतले जाणार आहे. २१ डिसेंबर रोजी मंगळवारी झालेल्या मतदानासह २० तारखेला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे. यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे भवितव्य सध्या ईव्हीएमच्या पेटीत बंद झाले आहे.